
त्राटी शिक्षकांच्या कायमस्वरूपी सेवेसह OBC आरक्षणासाठी पालघरमध्ये आंदोलन; आमदार गावितांच्या निवासस्थानासमोर ठिय्या
पालघर : जनतेचा वाली कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासह पवित्र पोर्टलवर OBC आरक्षण शून्य टक्के दाखविल्याच्या निषेधार्थ बाधित शिक्षक उमेदवार आणि OBC कार्यकर्त्यांनी गुरुवारी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.
सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांना पालघर पूर्व येथील शासकीय विश्रामगृहात आंदोलन करण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी सुमारे १.३० वाजता आमदार राजेंद्र गावित आंदोलकांच्या भेटीस आले. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
स्थानिक आदिवासी शिक्षकांची TET-२०२२ची पात्रता गृहीत धरून त्यांना सरळसेवेने सेवेत सामावून घेतल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील बिगरआदिवासी स्थानिक कंत्राटी व मानधनावरील शिक्षकांनाही सेवेत सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच २०१७ आणि २०२२ मधील पात्रता ग्राह्य धरून वयोमर्यादा ओलांडलेल्या शिक्षकांचीही भरती करावी, अशी मागणी करण्यात आली.
पवित्र पोर्टल रद्द करून त्याऐवजी पवित्र पोर्टलमध्ये स्थानिक OBC उमेदवारांसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून त्याद्वारे भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. पालघर जिल्ह्याबाहेर नोकरीसाठी जाणार नसून स्थानिक उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळावी, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.
दरम्यान, आमदार राजेंद्र गावित यांनी शिक्षणमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मात्र मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. पालघर जिल्ह्यात आठ विधानसभा, दोन विधान परिषद सदस्य तसेच दोन खासदार असे लोकप्रतिनिधी असूनही न्याय मिळाला नाही, तर लोकप्रतिनिधींना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला. रस्त्यावरचे आंदोलन आणि न्यायालयीन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
आता शिक्षण विभाग आणि राज्य सरकार या प्रश्नावर काय भूमिका घेते, तसेच स्थानिक कंत्राटी शिक्षक व OBC उमेदवारांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघतो, याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
