बोईसर येथे दुकान लावण्याच्या वादातून सँडविच विक्रेत्यावर लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला; पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

​जनतेचा वाली / पालघर प्रतिनिधी:

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा मनात राग धरून सँडविच विक्रेत्यावर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षनाथ ब्रम्हदेव तिवारी (वय ३९ वर्षे, रा. पाठक चाळ, दांडीपाडा, बोईसर पूर्व) यांचे सँडविचचे दुकान आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका अनोळखी इसमाने त्यांच्या सँडविच काऊंटरच्या शेजारी कपड्यांचे दुकान लावण्याचा प्रयत्न केला असता, तिवारी यांनी “इथे टॅक्सी स्टँड असल्याने दुकान लावू नकोस” असे समजावून सांगितले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून, त्या इसमाने इतर दोन साथीदारांसह २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सँडविच काऊंटरवर येऊन तिवारी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हातोडीने त्यांच्या डोक्यावर, डाव्या गालावर आणि कानावर जबर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ११९ (२), ३ (५) अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे २४ सप्टेंबर रोजी सुनिलकुमार जादूगर पहलवान (वय २८ वर्षे), हिमांशु राजेशकुमार मिश्रा (वय २६ वर्षे) आणि शुभम माताचरण दुबे (वय ३० वर्षे, सर्व रा. गणेशनगर, बोईसर, जि. पालघर; मूळ रा. उत्तर प्रदेश) या तीन संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्यांनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी हातोडा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे करत आहेत.

​सदरची यशस्वी कामगिरी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहीत ख्रोत, पोलीस हवालदार दिपक राऊत, संदिप सुर्यवंशी, संदिप सरदार, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, कपिल नेमाडे, संजय धांगडा, पोलीस नाईक कल्याण केंगार तसेच पोलीस अंमलदार प्रशांत निकम आणि वैभव जामदार यांच्या पथकाने केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *