जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव


पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
डहाणू : पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डहाणू येथील एन. के. पाटील कॅम्पिंग ग्राउंड येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीकांत सावे यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत सावरा, आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पर्यटन संचालनालय कोकण विभागाच्या संचालिका डॉ. प्रज्ञा मनोहर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. किणी, ठाणे डिस्ट्रिक्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचे श्री. पाठारे, बोर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच श्याम दुबळा, घोलवड ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र बुजड, अस्वाली ग्रामपंचायतीचे सरपंच वनश्या चुंबले, डहाणू नगरपरिषदेचे अध्यक्ष राजू माच्छी, भरतभाई राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आणि पर्यटन, तसेच शाश्वत पर्यटन व विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ऋषिकेश करंदीकर यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत, तर सूर्यहास चौधरी यांनी शाश्वत पर्यटन व विकासाबाबत माहिती दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पर्यटन क्षेत्रातील योगदानाचा गौरव
पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशनतर्फे पर्यटन क्षेत्रातील विशेष पुरस्कार यज्ञेश सावे (डहाणू), विदुला पाटील (बोर्डी) आणि विदिश राऊत (सफाळे) यांना प्रदान करण्यात आले.
तर पर्यटन संचालनालय, कोकण विभागातर्फे ‘पर्यटन मित्र पुरस्कार’ प्रभाकर सावे (घोलवड), हरिश्चंद्र चौधरी (केळवा), आकाश सावे (बोर्डी) आणि संध्या म्हात्रे (बोर्डी) यांना देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठाकूर आणि कार्यकारिणी सदस्यांसह बोर्डी, नरपड व डहाणू परिसरातील पर्यटन व्यावसायिकांनी सहकार्य केले. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटन यांचा समन्वय साधण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *