वर्दीतली माणुसकी! कासा पोलिसांचा दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आधार


पालघर : कासा प्रतिनिधी
धानिवरी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत कासा पोलीस ठाण्याने कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा हात पुढे केला. १३ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक अमर पाटील, सागर मेजर आणि कासा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बापुगाव येथील लाखातपाडा येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
बापुगाव येथून धानिवरी खडकीपाडा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर टेम्पोला हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कासा पोलिसांनी मृतांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जखमींच्या प्रकृतीचीही विचारपूस करून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
कायदेशीर प्रक्रियेसंदर्भात कासा पोलीस ठाण्याकडून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी कुटुंबीयांना दिली. मात्र, पोलिसांची ही भेट केवळ सांत्वनापुरती मर्यादित राहिली नाही.
अपघातात कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने काही कुटुंबांसमोर शेतीकाम आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. संकटाच्या काळात गावाने गावासाठी उभे राहण्याची गरज असून, या कुटुंबांना शेतीकाम, मजुरी तसेच इतर दैनंदिन कामांमध्ये शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कासा पोलीस ठाण्याच्या वतीने दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना किराणा किट तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी पोलीस यंत्रणा नागरिकांच्या पाठीशी उभी असल्याचा विश्वास कुटुंबीयांना मिळाला.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच संकटग्रस्त नागरिकांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर आधार देणे हीदेखील पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. कासा पोलिसांच्या या संवेदनशील उपक्रमातून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले असून, सामाजिक एकजुटीचा संदेशही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *