बोईसर-चिल्हार मार्ग अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडेचौपदरीकरणानंतर चार वर्षांतच रस्त्याची दुरवस्था; १९५ कोटींच्या उन्नतीकरणाला प्रशासकीय मान्यता

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
तारापूर औद्योगिक वसाहतीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ शी जोडणाऱ्या महत्त्वाच्या बोईसर-चिल्हार राज्य मार्ग क्रमांक ४७चे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अखेर हस्तांतरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित असलेल्या सुमारे १८ किलोमीटर मार्गाच्या उन्नतीकरणासाठी राज्य सरकारने १९५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
बोईसर-चिल्हार मार्गामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीसह तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि भाभा अणुसंशोधन केंद्र राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातात. भविष्यात वाढवण बंदर, जेएसडब्ल्यू मुरबे बंदर तसेच बोईसर येथील बुलेट ट्रेन स्थानक या मार्गाशी जोडले जाण्याची शक्यता असल्याने या रस्त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
मात्र, या मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे १२५ कोटी रुपये खर्चून १३ किलोमीटरच्या दुपदरी मार्गाचे २०२१ मध्ये चौपदरीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या चार-पाच वर्षांतच रस्त्याच्या अनेक भागांत डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या मार्गावर दररोज सुमारे २० ते २५ हजार दुचाकी, खासगी, प्रवासी आणि अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खैरा पाडा उड्डाणपूल, बिरसा मुंडा चौक, अधिकारी पेट्रोल पंप, लालोंडे, चरी, वेळगाव, खुटल आणि चिल्हार परिसरात पावसाळ्यात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.
आता हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्याने १९५ कोटींच्या प्रस्तावित उन्नतीकरणातून रस्त्याचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, यापूर्वी मोठा खर्च करून केलेल्या चौपदरीकरणाची अल्पावधीत झालेली दुरवस्था लक्षात घेता, नव्या कामाची गुणवत्ता, देखभाल आणि निधीचा प्रभावी वापर याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *