अमली पदार्थांविरोधात कासा पोलिसांची मोहीम; धुंदलवाडीत १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमली पदार्थमुक्त अभियानासाठी कासा पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

धुंदलवाडी : अमली पदार्थमुक्त अभियान आणि शून्य सहनशीलता धोरणाच्या अनुषंगाने कासा पोलिसांकडून धुंदलवाडी येथील वेदांता मेडिकल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाला.
कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. अमली पदार्थांच्या सेवनामुळे मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता ढासळणे, विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होणे तसेच नैराश्यासारख्या मानसिक समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कोणालाही ओटीपी देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद संदेश किंवा फोनपासून सावध राहावे, असे पोलिसांनी सांगितले. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असलेल्या ११२ या अत्यावश्यक सेवेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मोटार वाहन कायदे व वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावर सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी आणि वाहतूक शिस्त याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, अमली पदार्थमुक्त अभियान आणि शून्य सहनशीलता या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी मुख्याध्यापकांना दिलेले पत्र संस्थेला सुपूर्द करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यदिनी घेण्यात येणाऱ्या अमली पदार्थमुक्तीच्या शपथेची प्रतही देण्यात आली.
या कार्यक्रमाला मेडिकलचे अधीक्षक माने, कॉलेजचे डीन, शिक्षक आणि सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *