बोईसरमध्ये गुटख्याचा खुलेआम धंदा;  डोमकावळ्याच्या आशीर्वादाने

बोईसरमध्ये गुटख्याचा खुलेआम धंदा; कारवाई कुणाच्या आशीर्वादाने?
बोईसर : महाराष्ट्रात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध असतानाही बोईसर शहरात गुटखा व पानमसाल्याची विक्री सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे. शहरातील अनेक टपऱ्या आणि दुकानांमध्ये हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याने संबंधित यंत्रणांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा व्यवसाय सुरू असल्याने गुटखा विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर अधूनमधून कारवाई केली जात असली, तरी त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी विक्री सुरू होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बोईसर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या कथित आशीर्वादामुळेच गुटख्याचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र आणि अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
गुटखा विक्री करणारे दुकानदार, पुरवठा करणारे आणि त्यामागील साखळी यांच्यावर कठोर कारवाई होणार का? तसेच प्रतिबंधित गुटखा शहरात पोहोचतो तरी कसा, याचा तपास केला जाणार का? या प्रश्नांची उत्तरे आता बोईसर पोलिस प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई कधी होणार, याकडे बोईसरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *