चारोटी टोलनाक्यावर सोनसाखळी चोराला अटक; चोरीची दुचाकीही जप्त

सोनसाखळी चोराला अटक; चोरीची दुचाकीही जप्त
चारोटी : प्रतिनिधी जनतेचा वालीगुजरातमधील बिल्लीमोरा परिसरात पादचाऱ्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील सोन्याची चैन लुटून मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या सराईत सोनसाखळी चोराला महामार्ग पोलीस केंद्र, चारोटीच्या पथकाने पाठलाग करून चारोटी टोलनाक्यावर ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.
बिल्लीमोरा पोलीस ठाणे, जिल्हा नवसारी, गुजरात हद्दीत सोन्याचे दागिने लुटून आरोपी असदुल्ला फयास खान (वय ४७, रा. आंबेवली, इंद्रानगर झोपडपट्टी, आंबेवली पश्चिम) हा MH 02 GU 8722 क्रमांकाच्या दुचाकीवरून गुजरातच्या दिशेने मुंबईकडे पळून जात असल्याची माहिती वलसाड क्राईम ब्रँच तसेच तलासरी पोलिसांकडून चारोटी पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच चारोटी येथील आरटीओ चेक पोस्ट, दापचारी येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना संशयित दुचाकी अडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही दुचाकीस्वार न थांबता पुढे निघून गेला. त्यानंतर पोलीस अंमलदार विशाल वझे आणि सुयोग भारती यांनी खासगी वाहनाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला. दुचाकीचे लोकेशन चारोटी पोलिसांना सातत्याने देण्यात येत होते.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, पोलीस नाईक प्रमोद धूम आणि सहायक पोलीस नाईक संजय चव्हाण हे चारोटी टोलनाक्यावर थांबले होते. दुपारी सुमारे १२.१५ वाजता संशयित दुचाकी चारोटी टोलनाक्यावर दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी बिल्लीमोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५७/२०२६ दाखल आहे. विशेष म्हणजे आरोपीने वापरलेली MH 02 GU 8722 ही दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ दाखल आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला कासा पोलीस ठाण्यामार्फत बिल्लीमोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच वलसाड क्राईम ब्रँचच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, पोलीस नाईक प्रमोद धूम, पोलीस अंमलदार विशाल वझे, सुयोग भारती आणि सहायक पोलीस नाईक संजय चव्हाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *