
८ सप्टेंबरच्या रात्री विशेष मोहीम; रस्त्यावर आढळणारा गोवंश गोशाळेत हलविणार
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर मोकाट गायी, बैल आणि म्हशींचा वावर वाढल्याने अपघातांचा धोका गंभीर बनला आहे. वाहनांसमोर अचानक येणाऱ्या या जनावरांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, या प्रश्नाची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रशासनाला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
दूध काढताना गायीची आठवण आणि नांगर धरताना बैलाची आठवण होते; मात्र त्याच गोवंशाला चारा-पाणी आणि सुरक्षित निवारा देण्याची जबाबदारी आली की मालकांकडून दुर्लक्ष का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोवंश रस्त्यावर सोडून देण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली गोरक्षक आणि गोशाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रशासन, गोशाळा, गोरक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था तसेच सीएसआर संस्थांच्या समन्वयातून जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मालकांना दोन दिवसांची मुदत
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायी, बैल अथवा अन्य गोवंशाच्या मालकांनी आपली जनावरे दोन दिवसांत ताब्यात घ्यावीत, असे आवाहन मनोज रानडे यांनी केले आहे. त्यानंतरही जनावरे रस्त्यावर मोकाट आढळल्यास प्रशासनामार्फत ती ताब्यात घेऊन संबंधित गोशाळांकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
यासाठी मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेपूर्वी जिल्ह्यातील मोकाट गोवंशाची संख्या, उपलब्ध गोशाळांची क्षमता, जनावरांसाठी आवश्यक जागा, वाहतूक व्यवस्था आणि मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
जनावरे ताब्यात घेताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असून, वाहनांच्या माध्यमातून गोवंश संबंधित गोशाळांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात येणार आहे. या कामासाठी सीएसआर संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
गोशाळा आणि गोरक्षकांच्या अडचणींवरही चर्चा
बैठकीत गोरक्षकांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध सूचना मांडल्या. रात्रीच्या वेळी मोकाट गोवंश ताब्यात घेण्याचे काम गोरक्षकांकडून केले जाते. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून अधिकृत ओळखपत्र किंवा बॅच देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे गोशाळेत आणल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेत गोशाळांना अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणीही करण्यात आली. या मोहिमेत होणारा वाहतूक आणि इतर आवश्यक खर्च प्रशासनामार्फत करण्यात यावा, अशी सूचनाही गोरक्षकांनी केली.
गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा रंग एकसारखा असावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काही गोरक्षकांनी स्वखुशीने काही प्रमाणात गोवंश आपल्या देखरेखीखाली घेण्याची तयारी दर्शविली.
कोणत्या भागातील गोवंश कुठे?
जिल्ह्यातील विविध भागांतून ताब्यात घेण्यात येणाऱ्या जनावरांचे गोशाळांमध्ये नियोजनबद्ध स्थलांतर करण्याबाबतही बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. पालघर-माहीम-बोईसर परिसरातील गोवंश देवखोप आणि वसई येथील गोशाळांकडे, तर आच्छाड-चारोटी परिसरातील गोवंश वापी येथील गोशाळेकडे पाठविण्याबाबत प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीस आदी घंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी व गोसेवक मनोज शहा, हमरापूर येथील पशुपती गोशाळेचे प्रतिनिधी केदार लेले, धुंदलवाडी येथील बहुला गोधाम गोशाळेचे प्रतिनिधी दामोदर दुलालदास, वाडा येथील श्रीराम दृष्टी गोशाळेचे प्रतिनिधी किशोर कराळे, देवखोप येथील गोशाळेचे प्रतिनिधी सुरेशभाई सावला, तसेच जिल्ह्यातील अन्य गोरक्षक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
‘जनतेचा वाली’चा सवाल
मोकाट गोवंशाचा प्रश्न हा केवळ जनावरांच्या संरक्षणाचा नसून रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्नही आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली किंवा अचानक धावणारी जनावरे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाची ही मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविली जाणे आवश्यक आहे.
गोवंश पाळणाऱ्या मालकांनी जनावरांची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. दूध आणि शेतीच्या कामासाठी जनावरांचा उपयोग करताना त्यांना चारा-पाणी देणे आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे हीदेखील मालकांचीच जबाबदारी आहे. जनावरे रस्त्यावर सोडून देऊन अपघात घडल्यास त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच मोकाट गोवंशाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक देखभाल मिळावी, या दुहेरी उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आपल्या मालकीची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत आणि प्रशासनाच्या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.