
निहे, प्रतिनिधी : जनतेचा वाळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पाठबळ मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट मालाड यांच्या माध्यमातून निहे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा हा उपक्रम ठरला आहे.
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट मालाडच्या विद्यमान अध्यक्षा सौ. भट मॅडम, भट सर, अग्रवाल सर, नामांकित उद्योजक मुनीर सर (पालघर) तसेच रोटरी क्लबची संपूर्ण टीम उपस्थित होती. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रोटरी क्लबने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी . योगेश पाटील (कोळगाव), कल्पेश संखे (कोळगाव) आणि विशाल नारायण पाटील (निहे) यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविणे शक्य झाले.
या प्रसंगी ग्रामपंचायत निहेचे सरपंच . एकनाथ हेमाडा, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अंतर्गत हिशोब तपासणी सदस्य सचिन पाटील, शाळा समितीचे सदस्य दिपेश विष्णू पाटील आणि प्रितेश गोलिम तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मॅडम, सहशिक्षिका ठाकरे मॅडम आणि भोये मॅडम यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी बुद्धिमान असूनही आर्थिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि शैक्षणिक साहित्याची कमतरता यामुळे अपेक्षित प्रगती करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट मालाडने दिलेले शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासात आणि शारीरिक क्षमतेतही सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समाजातील सक्षम घटकांनी पुढे येत ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्यास शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट मालाडचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.




