गणेशोत्सवासाठी तलासरी प्रशासन सज्ज; DJ नियमभंगावर कारवाईचा इशारा

पोलीस, तहसील प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक; २०० ते २५० मंडळांचे पदाधिकारी सहभागी

तलासरी, ८ सप्टेंबर : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी तलासरी पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, महिला व मुलींची सुरक्षा, ध्वनिप्रदूषण तसेच मंडप आणि विद्युत व्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात गणेश मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तलासरी तहसीलदार कार्यालयात पोलीस, विविध शासकीय विभाग आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय बैठक झाली.

डहाणू विभागाच्या SDPO निशा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, तलासरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रवि गोरे यांच्यासह PWD, महावितरण, NHAI तसेच संबंधित महामार्ग विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव समन्वय समिती, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता व मोहल्ला समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि DJ व ध्वनीक्षेपक चालक-मालकांनीही बैठकीला उपस्थिती लावली. सुमारे २०० ते २५० गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक या बैठकीत सहभागी झाले.

मिरवणुकीपूर्वी मार्गाची माहिती द्यावी

गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे मार्ग पूर्वनियोजित करून त्याची माहिती पोलीस व प्रशासनाला देण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी अथवा नागरिकांना अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक मंडळाने आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नियुक्त करून पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.

महिला, मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांशी अथवा मुलींशी गैरवर्तन होणार नाही, यासाठी मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. छेडछाड किंवा अन्य कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

अफवांना थारा नको

सोशल मीडियावरून अफवा, आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करून जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला. दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

मंडप आणि विद्युत सुरक्षेकडे लक्ष

गणेश मंडप उभारताना आवश्यक परवानग्या घेण्याबरोबरच रस्ता किंवा पादचारी मार्ग अडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंडपातील विद्युत रोषणाई, वायरिंग आणि जनरेटरची सुरक्षितता तपासण्याचेही निर्देश देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिकेला सहज मार्ग मिळेल, याची खबरदारी घेण्यास मंडळांना सांगण्यात आले.

DJवर निर्बंध; उल्लंघन झाल्यास कारवाई

गणेशोत्सवातील सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या DJ आणि ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत बैठकीत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील लागू कायदे, शासनाचे आदेश आणि न्यायालयीन निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

DJ संदर्भातील लागू बंदी व निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. गणेश मंडळांनी शक्यतो पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

‘जनतेचा उत्सव, जनतेचीच जबाबदारी’

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविण्याचा प्रसंग ठरावा, यासाठी मंडळे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी केली जात असली तरी उत्सव यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.

SDPO निशा जाधव यांनी पोलीस, प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिक यांच्यातील समन्वय हाच शांततामय गणेशोत्सवाचा आधार असल्याचे सांगितले. सर्व मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि शांतता, सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, उत्सव आनंदात साजरा करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव उत्साहाचा असला तरी नियमबद्ध आणि जबाबदार असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *