
‘सुपोषण साथी पालघर’ उपक्रमाचा शुभारंभ; पहिल्या टप्प्यात ६५ गंभीर कुपोषित बालकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दत्तक
पालघर : कुपोषणाविरोधातील लढ्याला अधिक परिणामकारक आणि संवेदनशील स्वरूप देण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने ‘सुपोषण साथी पालघर’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६५ गंभीर तीव्र कुपोषित (SAM) बालकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्य आणि पोषणाची विशेष जबाबदारी घेण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ७३४ मध्यम तीव्र कुपोषित (MAM) बालकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
राष्ट्रीय पोषण माह २०२६ निमित्त केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि जिल्हा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेत दोन दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय प्रचार अधिकारी शिल्पा नीलकंठ पोफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी माता आणि बालक सुरक्षित व सुदृढ असतील, तरच विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राची निर्मिती शक्य असल्याचे सांगितले. माता-बाल आरोग्य आणि पोषण हा विकासाच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू असून, शासनाच्या योजनांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमी वजनाबरोबरच अधिक वजनाची समस्याही कुपोषणाच्या व्यापक स्वरूपाचा भाग आहे, याकडे डॉ. जाखड यांनी लक्ष वेधले. बालक आणि गर्भवती महिलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, काय खातो, किती खातो आणि कोणत्या वेळी खातो, याबाबतही जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमातील पोषणविषयक विविध स्टॉलना भेट देत त्यांनी महिलांशी संवाद साधला.
सहा महिन्यांची विशेष मोहीम
१५ सप्टेंबर २०२६ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत ‘सुपोषण साथी पालघर’ उपक्रमाचा पहिला टप्पा राबविला जाणार आहे. या काळात ६५ SAM बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्याचे वजन, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार आणि औषधोपचाराची गरज यांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
संबंधित अधिकारी-कर्मचारी बालकांच्या घरी नियमित भेटी देणार असून, कुटुंबीयांना पोषणाबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाणार आहे. गंभीर स्थितीतील बालकांना VCDC किंवा NRCमध्ये दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असून, गरजेनुसार प्रथिनेयुक्त अतिरिक्त आहारही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
केवळ वजन वाढविणे नव्हे, सर्वांगीण विकासावर भर
कुपोषणावर मात करताना केवळ बालकाचे वजन वाढविण्यापुरते अभियान मर्यादित न ठेवता त्याच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रांतील आवश्यक सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचे समुपदेशन याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने या अभियानात सहभागी होऊन कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रशासन, अंगणवाडी यंत्रणा आणि समाज यांच्या समन्वयातून कुपोषणमुक्त पालघरच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हा परिषद परिसरात संतुलित आहार, कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माहितीफलक, सेल्फी स्टॅण्ड आणि स्वाक्षरी फलकही उभारण्यात आले आहेत.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि लाभार्थी उपस्थित होते. केंद्रीय संचार ब्युरोच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चित्रप्रदर्शनाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
