
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, जव्हार यांच्या वतीने आयोजन; दोन हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
जव्हार, प्रतिनिधी जनतेचा वाली : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, व जव्हार शहरातील प्रगती प्रतिष्ठान येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य आणि भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उत्सवाचे पाचवे वर्ष असून, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला दोन हजारांहून अधिक भाविक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
उत्सवानिमित्त उपस्थित भाविकांसाठी भंडारा आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यास आमदार हरिश्चंद्र भोंये यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जन्माष्टमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हस्ताक्षर स्पर्धेत ११०, तर चित्रकला स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळविली.
दरम्यान, विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढविली. ज्ञानगंगा, प्रगती प्रतिष्ठान, के. व्ही. हायस्कूल, नगरपालिका विद्यालय, युनिव्हर्सल स्कूल, वेदश्री आणि गुरुकुल या शाळांतील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
भजन, अभंग, भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण तसेच श्रीमद्भागवतातील श्लोकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. भारतीय संस्कृती, अध्यात्मिक मूल्ये आणि भक्तीची ओळख विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून उपस्थितांना झाली.
पाचव्या वर्षात प्रवेशलेल्या या उत्सवात लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध शाळांचे सहकार्य आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे जव्हारमधील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. प्रेम, भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा नागरिकांसाठी संस्मरणीय ठरला.