वाढवण बंदराच्या सर्विस रोडविरोधात २ ऑक्टोबरला सविनय कायदेभंग

Writing
वाढवण बंदराच्या सर्विस रोडविरोधात २ ऑक्टोबरला सविनय कायदेभंग
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर : वाढवण बंदर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या सर्विस रोडच्या कामात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती तसेच मच्छीमार, आदिवासी, युवा आणि इतर सहयोगी संघटनांनी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्विस रोडचे काम सुरू झाल्यापासून ५०० मीटर परिसरात उपविभागीय अधिकारी, डहाणू यांनी मनाई आदेश काढल्याचे समितीचे म्हणणे आहे. हा आदेश अस्तित्वात असतानाही काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वरोर येथे लागणारा आणि वाणगाव येथून मिळणारा आवश्यक ‘स्टॉक पास’ नसतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा दावा समितीने केला आहे.
या मार्गावर ३५ ते ४० टन वजनाचे ट्रक धावत असून, या रस्त्याची एवढ्या वजनाची वाहतूक सहन करण्याची क्षमता नसल्याने स्थानिक रस्त्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता सर्विस रोडचे काम सुरू करण्यात आल्याचा दावाही संघर्ष समितीने केला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप समितीने केला. प्रशासनाकडून ‘सर्व्हर डाऊन आहे’, ‘ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नाही’, तसेच ‘रस्ते नंतर दुरुस्त केले जातील’, अशी उत्तरे दिली जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि नियमांचे कथित उल्लंघन याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जनहित आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गांधी जयंतीच्या दिवशी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात बाधित नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, मच्छीमार व आदिवासी संस्था-संघटना, युवा संघर्ष समिती आणि सहयोगी संघटनांनी केले आहे.
आयोजक : वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, सर्व मच्छीमार व आदिवासी संस्था-संघटना, युवा संघर्ष समिती आणि सहयोगी संघटना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *