पालघरमध्ये ७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; कासा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

​पालघर / डहाणू :

महाराष्ट्र शासनाने आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर घातलेल्या बंदीची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि कासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (NH-08) तवा गावच्या हद्दीत एका बंद आयशर ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा सुमारे ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि २० लाखांचे वाहन असा एकूण ७० लाख ५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश रामराव कावळे (वय ४०, अन्न व औषध प्रशासन, पालघर) आणि कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या पथकाला मुंबईकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरून प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप नेली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०४ वाजता डहाणू तालुक्यातील तवा गावच्या हद्दीत, राजधानी हॉटेल ते आश्रमशाळेदरम्यान महामार्गाच्या सर्विस रोडवर सापळा रचण्यात आला.

​संशयित आयशर बंद कंटेनर ट्रक (क्रमांक MH-43-Y-7911) अडवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला केसरयुक्त विमल पान मसाला आणि ‘व्ही ०१’ सुगंधित तंबाखूच्या गोणी आढळून आल्या. पोलिसांनी ट्रकमधून विमल पान मसाल्याच्या ९९ बोरी (किंमत रु. ४५,७३,८००), व्ही ०१ सुगंधित तंबाखूचे ७,२४५ पुडे (किंमत रु. २,१७,३५०), ग्रीन पाऊच १,६५० पुडे (किंमत रु. ८२,५००) आणि ब्ल्यू पाऊच ४,४०० पुडे (किंमत रु. १,३२,०००) असा एकूण ५० लाख ५ हजार ६५० रुपयांचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या सुमारे २० लाखांच्या आयशर वाहनासह एकूण ७० लाख ५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​या प्रकरणी आरोपी चालक मोहम्मद अनिस मोहम्मद आयुब शेख (वय ३९, रा. कलंबोली, पनवेल, जि. रायगड; मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सदर कारवाई कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धांगडा, सहाय्यक फौजदार माळी, पोलीस हवालदार भोये, पोलीस शिपाई भोसले आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोउपनि धांगडा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *