मासवण बंधाऱ्याची युवक मंडळाकडून स्वच्छतास्वच्छता अभियानातून गाळ, प्लास्टिक व निर्माल्य हटविले;

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान; नागरिकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन


पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर तालुका पूर्व विभागातील कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वतीने रविवारी (२७ सप्टेंबर) मासवण बंधारा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. युवक मंडळाचे अध्यक्ष वैभव नारायण पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात बंधारा परिसरातील गाळ, प्लास्टिक व निर्माल्य तसेच इतर कचरा हटविण्यात आला.
मासवण बंधारा परिसराचा पंचक्रोशीतील दशक्रिया विधी व उत्तरकार्यासाठी वापर केला जातो. मात्र विविध विधींनंतर निर्माल्य, प्लास्टिक कचरा, काढलेले केस, विधीसाठी वापरलेली मडकी तसेच पुरामुळे आलेला चिखल-गाळ परिसरात साचला होता. त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.
युवक मंडळाच्या माध्यमातून गेल्या तीन-चार वर्षांपासून येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या अभियानात परिसरातील मातीचा गाळ काढणे, वाढलेली काटेरी झुडपे व गवत हटविणे, कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक लावणे तसेच विविध फुलझाडांचे कुंड्यांमध्ये रोपण करण्यात आले.
या अभियानात अध्यक्ष वैभव पाटील, विश्वस्त उल्हास सातवी, उपाध्यक्ष प्रफुल पाटील, सुमित पाटील, भाग्यश्री अधिकारी, सचिव मुकेश पाटील, खजिनदार जतिन भोईर, सहसचिव पंकज ठाकूर, प्रतिक पाटील, अंतर्गत हिशोब तपासनीस विकास पाटील, सचिन पाटील, दिपेश पाटील, कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील, किरण पाटील, धिरज पावडे, सुजय अधिकारी, गट चिटणीस सागर पाटील, महिला प्रतिनिधी श्वेता अधिकारी व अस्मिता घरत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, परिसरातील समाजबांधव तसेच नागरिकांनी अभियानस्थळी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. माजी विश्वस्त भालचंद्र पाटील, भूषण अधिकारी, प्रफुल्ल पावडे, रणजीत पाटील, काशिनाथ पाटील, विलास पावडे, ऋतिक पवार, मित पाटील, निनाल संखे, किरण संखे, आशिष भोईर आणि पंकज पाटील यांचीही उपस्थिती होती.
मासवण बंधारा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून, नागरिकांनी सूचना फलकावरील नियमांचे पालन करावे, असे आवाहन अध्यक्ष वैभव नारायण पाटील यांनी केले. सचिव मुकेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत अभियानाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *