
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
दुर्वेश गाव परिसरात पाटेदार वाघाचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाचूचा पाडा, कडव पाडा, अटकारी पाडा आणि दळवी पाडा परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. कडव पाड्याकडे जात असताना वाघाचा फोटोही नागरिकांनी काढला आहे.
विशेष म्हणजे, सदर वाघ जंगलात न जाता थेट मानवी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघाच्या वावराची माहिती संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र, माहिती देऊनही अद्याप वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दुर्घटना घडल्यानंतरच वन विभाग जागा होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाघाचा मानवी वस्तीत वावर असल्याने वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.