ठेकेदार महसूल विभागालाही लावतो चुना?वाणगाव–वरोर दगड वाहतुकीवर ग्रामस्थांचा गंभीर आरोप;

वाणगाव–वरोर दगड वाहतूक ग्रामस्थांनी रोखली
वाहतूक पास, रॉयल्टी आणि वाहनांच्या क्षमतेवर ग्रामस्थांचा आक्षेप; महसूल विभागाच्या उपस्थितीत पंचनामा
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
वाढवण बंदरासाठी सुरू असलेल्या रस्ते बांधकामासाठी वाणगाव येथील साठवण केंद्रातून वरोरच्या दिशेने सुरू असलेली दगडाची अवजड वाहतूक आसनगाव, माटगाव आणि पंचकृषी परिसरातील ग्रामस्थांनी २४ सप्टेंबर रोजी रोखली. वाणगाव येथील साठवण केंद्रापासून वरोरपर्यंत दगड वाहतुकीसाठी आवश्यक वाहतूक पास नसल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप असून, या प्रकरणी मंडळ अधिकारी वाणगाव आणि ग्राम महसूल अधिकारी आसनगाव यांच्या उपस्थितीत लेखी पंचनामा करण्यात आला.
ग्रामस्थांनी दगडाने भरलेली वाहने अडवल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाहनांची कागदपत्रे तसेच वाहतुकीसंदर्भातील परवान्यांची पाहणी करण्यात आली. पंचनाम्यात वाणगाव येथील संबंधित कंपनीच्या साठवण केंद्रातून दगडाची वाहतूक होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाणगाव येथील साठवण केंद्रापर्यंतची रॉयल्टी असल्याचे सांगण्यात येत असले तरी, तेथून पुढे वरोरपर्यंत दगड वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र आवश्यक पास असणे गरजेचे आहे. याच मुद्द्यावरून ग्रामस्थांनी वाहतूक रोखली. मात्र, संबंधित वाहतूक प्रत्यक्षात कोणत्या परवान्याच्या आधारे सुरू होती, याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दहा वाहनांची नोंद
पंचनाम्यात दगड वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांचे क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये MH48 DC 4445, MH48 D6W 4445, MH48 PS 4445, MH48 CB 4445, MH48 DQ 4445, MH48 BX 1461, MH48 DC 4468, MH48 CQ 9299, MH48 CA 9302 आणि MH48 DQ 2612 या वाहनांचा समावेश आहे. संबंधित वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप असून, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवजड वाहतुकीमुळे स्थानिक रस्त्यांची हानी, धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका वाढत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात अनधिकृत उत्खनन आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
पोलिसांशी शाब्दिक वाद
ट्रक अडविल्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये घटनास्थळी शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात आले. बेकायदेशीर वाहतूक होत असल्यास प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी, वाहतूक अडवू नये, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावर ग्रामस्थांनी यापूर्वीच लेखी तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याचा आक्षेप घेतला.
महसूल अधिकाऱ्यांकडे रॉयल्टी आणि वाहतूक कागदपत्रांबाबत विचारणा करण्यात आली असता, वाणगाव येथील साठवण केंद्रापासून पुढील मार्गासाठी रॉयल्टी नसल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र, या चर्चेपूर्वीच संबंधित अवजड वाहने कंत्राटदारांकडून परत वळविण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संघर्ष समितीकडून चौकशीची मागणी
वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार, ग्रीनफिल्ड वाढवण बंदरासाठी रस्ते बांधकाम सुरू असून, त्यासाठी खदाणीतून आणलेला दगड वाणगाव येथील साठवण केंद्रात ठेवण्यात आला आहे. तेथून वरोरकडे दगडाची वाहतूक केली जात आहे. मात्र, वाणगाव ते वरोर या मार्गासाठी आवश्यक वाहतूक परवाना नसल्याचा समितीचा आरोप आहे.
रॉयल्टी, वाहतूक पास, वाहनांची भारवाहक क्षमता आणि उत्खनन परवान्यांची प्रशासनाने स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेनंतर संध्याकाळी काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा सोडण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दगड वाहतूक नेमक्या कोणत्या परवान्यांच्या आधारे सुरू होती, रॉयल्टीची व्याप्ती किती होती आणि वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल होता का, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत कारवाईची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *