पालघर बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार :- आमदार विलास तरे

इ
व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेजसह विविध प्रकल्पांसाठी पाठपुरावा
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक सक्षम करण्याबरोबरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.
मौजे नंडोरे येथे पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री, खासदार तथा विद्यमान आमदार राजेंद्र गावित आणि आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक विनय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची आणि सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून विविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेज, मंगल कार्यालय तसेच खरेदी-विक्री केंद्र उभारण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
बाजार समितीच्या विकासासाठी शासनस्तरावरही प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार राजेंद्र गावित आणि आमदार विलास तरे यांनी सांगितले. प्रस्तावित सुविधांमुळे शेतमालाची साठवणूक, खरेदी-विक्री आणि व्यापारी व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती उत्तम पाटील, माजी सभापती तथा सेवा सहकारी संस्थांचे संचालक अनिल गावड, नागेश पाटील, सुरेश पाटील, सुहास संखे, भूषण पावडे, वनिता पाटील, अंकुश जाबर, हेमंत संखे, पुंडलिक पाटील, दुर्जला सोगले, जयेश मोरे, पंकज शहा, हिंमतलाल जैन, अंकुश घरत यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उपस्थित होते.
चौकट
शेतमालाला व्यापक बाजारपेठेशी जोडणार
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव आणि व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्त्वाची आहे. बाजार समिती अधिक सक्षम आणि सुविधायुक्त करून शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार विलास तरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *