
चारोटी पुलावर रेजिन वाहून नेणारा टँकर
डहाणू : गुजरातहून तळोजाकडे जाणारा रेजिन वाहून नेणारा केमिकल टँकर डहाणू तालुक्यातील चारोटी पुलावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) दुपारी साडेदोनच्या सुमारास पलटी झाला. या अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला कासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टँकरमधील रेजिन हे कलर आणि पेंटमध्ये मिश्रणासाठी वापरले जाणारे रसायन आहे. केमिकल तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे रसायन ज्वलनशील (फ्लेमेबल) नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घटनास्थळी संभाव्य धोका टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
टँकर बाजूला करण्यासाठी तीन क्रेनच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले. टँकर सरळ करून बाजूला घेतल्यानंतर पुलावर सांडलेला पदार्थ माती आणि पाण्याच्या साहाय्याने साफ करून पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर अग्निशमन दल, डहाणू नगर परिषद, अदानी थर्मल पॉवर तसेच बोईसर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दरम्यान, पुलाच्या खालील मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत सुरू असून सध्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील, तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.