पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी ‘सेवा संकल्प अभियान’; विविध योजनांची माहिती व लाभाचे वितरण

पालघर: आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या वतीने आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी, सेवा आपल्या गावात’ ही संकल्पना राबवली जात आहे.

या अभियानांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, एंबूर-ऐरंबी (ता. जि. पालघर) येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे उपस्थित राहणार आहेत. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणूच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी (भा.प्र.से.) यांच्या पुढाकाराने व आयोजनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (Nucleus Budget), शासकीय वसतिगृह योजना, नामांकित शाळा योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय कृषी, शिक्षण, आरोग्य व इतर सेवांशी संबंधित योजनांचे मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती आणि प्रत्यक्ष लाभ वितरण करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *