पालघरच्या रस्त्यांवरील अपघातांना लगाम घालण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

२५ ब्लॅक स्पॉट्सवर सुधारणा; ५३ अनधिकृत मीडियन ओपनिंग्ज बंद | सहा महिन्यांत सहा नवीन पादचारी पूल | रुग्णवाहिकांचा प्रतिसाद पाच मिनिटांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट
पालघर,जनतेचा वाली  दि. १९ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची खालावलेली स्थिती, वाढते अपघात आणि अपघातानंतरच्या आपत्कालीन व्यवस्थेतील आव्हाने लक्षात घेऊन पालघर जिल्हा प्रशासनाने रस्ता सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह (NHAI) विविध विभागांना स्पष्ट कामे आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
रस्ता सुरक्षा ही केवळ बैठकीपुरती किंवा कागदोपत्री बाब न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असून, प्रत्येक बैठकीत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले.
२५ ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील जिल्ह्यातील २५ अपघातप्रवण ठिकाणांचा आढावा घेऊन या ठिकाणी सुधारणा करण्याचे निर्देश NHAIला देण्यात आले. इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांसह Resilient India संस्थेने केलेल्या अभ्यासातील शिफारशींचा विचार करून उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या ब्लॅक स्पॉट्ससाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. वाहनचालकांना धोकादायक ठिकाणांची पूर्वकल्पना मिळावी यासाठी ही ठिकाणे Google Mapsवर दर्शविण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.
चारोटी उड्डाणपूल परिसरातील अपघात तसेच टँकर आणि रासायनिक पदार्थांच्या वाहतुकीशी संबंधित अपघातांचा स्वतंत्रपणे सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘गोल्डन अवर’मध्ये उपचार; रुग्णालयांनाही मुदत
अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने उपचार व्यवस्थेवरही भर दिला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ३० मिनिटांच्या आत जखमीवर उपचार सुरू झाले पाहिजेत, असे निर्देश देण्यात आले.
शासकीय तसेच खासगी रुग्णालयात अपघातग्रस्त दाखल झाल्यानंतर तीन तासांच्या आत वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणाची (MLC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत विलंब झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हे निर्देश सर्व रुग्णालयांपर्यंत तातडीने पोहोचवून अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. PM-RAHAT योजनेबाबत महामार्गालगत जनजागृती फलक लावण्यात येणार आहेत.
सहा रुग्णवाहिका, चार गस्ती वाहने; GPSची तपासणी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८च्या पालघर जिल्ह्यातील हद्दीत NHAIच्या सहा रुग्णवाहिका आणि चार गस्ती वाहने कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या वाहनांच्या मागील सात दिवसांच्या GPS नोंदी सादर करण्याचे निर्देश NHAIला देण्यात आले आहेत.
ब्लॅक स्पॉट्सच्या आधारे रुग्णवाहिकांची ठिकाणे नव्याने निश्चित करण्यात येणार असून, त्याची माहिती महामार्ग सुरक्षा पथकाला देण्यात येईल.
रुग्णवाहिका आणि गस्ती वाहनांचा प्रतिसाद कालावधी पाच मिनिटांपेक्षा कमी करण्यासाठी NHAI आणि महामार्ग पोलिस संयुक्तपणे SOP तयार करणार आहेत. संयुक्त गस्तीसाठीही स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
आरोग्य विभागाच्या सहकार्याने अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. १०३३ महामार्ग हेल्पलाइनबाबत जनजागृती करून महामार्गावर रुग्णवाहिका आणि गस्ती पथकांचे संपर्क क्रमांक ठळकपणे प्रदर्शित केले जाणार आहेत.
५३ मीडियन ओपनिंग्ज बंद; पुन्हा उघडल्यास सात दिवसांत दुरुस्ती
महामार्गाच्या दुभाजकातील अनधिकृत छेद अपघातांना कारणीभूत ठरू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ओळखण्यात आलेले सर्व ५३ मीडियन ओपनिंग्ज बंद करण्यात आल्याची खातरजमा करण्यात आली.
हे छेद कायमस्वरूपी बंद ठेवण्यासाठी सिमेंटच्या अडथळ्यांऐवजी मेटल बीम क्रॅश बॅरिअर आणि न्यू जर्सी प्रकारचे क्रॅश बॅरिअर बसविण्याचे काम सुरू आहे.
बॅरिअरचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध NHAIमार्फत पोलिसांत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठेही बॅरिअर तोडल्याचे आढळल्यास ते सात दिवसांत पूर्ववत करण्याचे निर्देश आहेत.
दुभाजकातील छेदांवर नजर ठेवण्यासाठी NHAIसाठी रिअल-टाइम देखरेख प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. ढाब्यांमधून महामार्गावर होणारे अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी ROWमध्ये बॅरिअर उभारणे किंवा चर खोदण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
सहा नवीन पादचारी पूल; ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी NHAIने दहा पादचारी पूल पूर्ण केले आहेत. तलासरी, नीलगिरी हॉटेल, आंबोली, खानिवडे, बापाणे आणि ससूनवघर या सहा ठिकाणी नवीन पादचारी पुलांची कामे ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार असून, सहा महिन्यांत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
आणखी काही ठिकाणांचा समावेश DPRमध्ये करण्यात येत असून त्यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
७९ पैकी ७७.६५ किलोमीटर सर्व्हिस रोड पूर्ण
विरार फाटा ते घोडबंदरदरम्यानच्या ७९ किलोमीटर सर्व्हिस रोडपैकी ७७.६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित १.३५ किलोमीटरच्या कामासाठी अडथळा ठरत असलेल्या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले.
प्रलंबित सर्व सर्व्हिस रोडची कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहन भुयारी मार्गांची योग्य देखभाल करण्यासह घोडबंदर–बापाणे दरम्यानचे आरसीसी गटार आणि जलनिस्सारणाचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
१६०A आणि सोमटा रस्त्यालाही मुदत
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०Aवरील काम ऑक्टोबर २०२६अखेर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमटा रस्त्याचे कामही याच कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश आहेत.
वाडा–मनोर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. रस्ते आणि सूचना फलकांच्या कामांसाठी NHAI व सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष समिती दरमहा प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामांचा आढावा घेणार आहे.
शिरसाडपर्यंत द्रुतगती मार्ग एका महिन्यात खुला करण्याचे निर्देश
वसई परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई–वडोदरा द्रुतगती महामार्गाचा शिरसाडपर्यंतचा भाग एका महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले. संपूर्ण द्रुतगती महामार्ग डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
वसई परिसरात वाहतूक वॉर्डन तैनात करण्याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८वरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे हटविणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८च्या हद्दीतील (ROW) सर्व अनधिकृत बांधकामे ऑक्टोबर २०२६अखेर हटविण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. विशेषतः डाव्या मार्गिकेचा नियम न पाळणाऱ्या आणि मार्गिका शिस्त मोडणाऱ्या मालवाहू व परिवहन वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
ग्रामीण भागात उंची प्रतिबंधक अडथळे उभारण्यासह रस्ता सुरक्षेबाबत सूचना फलक आणि IEC मोहिमा राबविण्यात येणार आहेत. ‘Sanjay’ ॲपचा प्रचारही करण्यात येत आहे.
महामार्गालगत स्वच्छतागृहांचीही सुविधा
प्रवाशांच्या सुविधेसाठी महामार्गालगत नवीन स्वच्छतागृहांच्या कामांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
‘Aspirational Toilet Model’नुसार स्वच्छतागृहे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून चारोटी आणि खानिवडे टोलनाक्यांवरही नवीन स्वच्छतागृहे बांधण्यास सांगण्यात आले आहे.
आता प्रश्न अंमलबजावणीचा!
रस्ता सुरक्षा, अपघातप्रवण ठिकाणे, खड्डे, अनधिकृत प्रवेश, वाहतूक कोंडी, अपघातानंतरची वैद्यकीय मदत आणि महामार्गावरील सुविधांबाबत प्रशासनाने एकाच बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रत्येक विभागाला काम आणि त्यासाठी अंतिम मुदतही देण्यात आली आहे.
मात्र, या सर्व निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे आता पालघरकरांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ब्लॅक स्पॉट्सवरील सुधारणा, मीडियन ओपनिंग्ज कायमस्वरूपी बंद ठेवणे, रस्त्यांची गुणवत्ता, खड्डे, अनधिकृत बांधकामे आणि अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळणे या बाबींची प्रत्यक्ष पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.
“रस्ता सुरक्षा ही केवळ औपचारिकता नाही. प्रत्येक विभागाला स्पष्ट काम आणि ठरलेली मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक बैठकीत त्याचा आढावा घेतला जाईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगितले.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थितीत १०३३ हेल्पलाइनचा वापर करावा आणि रस्ते सुरक्षित करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *