पालघर : वाढवण बंदर प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या मच्छिमार, आदिवासी, बागायतदार तसेच अन्य स्थानिक समूहांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. वरोर येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
NAPM शी संलग्न महाराष्ट्रासह विविध राज्यांतील प्रतिनिधींनी १९ आणि २० सप्टेंबर असे दोन दिवस वाढवण बंदरामुळे प्रभावित होणाऱ्या परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान वाढवण बंदर क्षेत्रातील जमिनीवरील सद्यस्थितीची पाहणी करण्याबरोबरच किनारपट्टीवरील मच्छिमार समूह, मच्छिमारीशी संबंधित कामे करणारे आदिवासी, तसेच बागायती व्यवसायाशी निगडित नागरिकांच्या समस्या, चिंता आणि भूमिका जाणून घेण्यात आल्या.
वाढवण बंदरासह पालघर परिसरातील पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या विविध विकास प्रकल्पांविरोधात गेल्या अनेक दशकांपासून स्थानिक पातळीवर आंदोलने सुरू असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. या संघर्षात NAPM सुरुवातीपासून सहभागी असल्याचेही समितीने म्हटले आहे. NAPMच्या मेधा पाटकर तसेच जागतिक मच्छिमार संघटनेचे दिवंगत नेते थॉमस कोचेरी, रामभाऊ पाटील आणि एन. डी. कोळी यांचाही या आंदोलनात सहभाग राहिल्याचे आयोजकांनी नमूद केले.
दरम्यान, अलीकडील काळात वाढवण परिसरात वृक्षतोडीसह अन्य हालचाली सुरू असल्याचा दावा संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती, स्थानिकांच्या समस्या आणि पर्यावरणीय प्रश्न पत्रकारांसमोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे समितीने सांगितले.
दोन दिवसांच्या पाहणी व स्थानिकांशी संवादानंतर NAPM आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती पत्रकारांशी संवाद साधणार आहे. या पत्रकार परिषदेत वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर होणारे संभाव्य परिणाम, पर्यावरणीय प्रश्न तसेच परिसरातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली जाणार आहे.
स्थळ : वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे धरणे आंदोलन, वरोर
वेळ : रविवार, २० सप्टेंबर २०२६, सकाळी ११ वाजता
संपर्क : सुजय मोरे – ९८६७६८०००६