डिजिटल माध्यमातून पर्यटनाची नवी ओळख; बोर्डीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन


पालघर : जनतेचा वाली पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी बोर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ४ वाजता एन. के. पाटील सभागृह, एस. आर. सावे कॅम्पिंग ग्राउंड, बोर्डी येथे करण्यात आले आहे. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता : पर्यटनाची नव्याने रचना’ या विषयावर आधारित आहे.
पर्यटन क्षेत्रातील बदलत्या डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्थानिक पर्यटनस्थळे आणि रिसॉर्ट्सची अधिक व्यापक प्रसिद्धी करण्याचा उद्देश यामागे आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून पर्यटन व्यवसायाला नवी दिशा देण्यावर या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या सभासदांना त्यांच्या रिसॉर्टच्या जाहिरातीसाठी नवीन रील, व्हिडिओ किंवा छायाचित्रे डिजिटल स्वरूपात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही सामग्री संस्थेचे संचालक राहुल म्हात्रे (नेचर स्टे, सफाळे) यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटन व्यावसायिकांनी डिजिटल माध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर करून आपल्या व्यवसायाची आणि पालघर जिल्ह्यातील पर्यटनाची व्यापक ओळख निर्माण करावी, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे संस्थेचे कार्यवाह अजय राऊत यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *