कुपोषित बालकाच्या घरी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट


पोषणासोबत कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर; शासकीय योजनांशी जोडण्याच्या सूचना
पालघर, दि. १९ : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ प्रशासकीय उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता कुपोषित बालकांच्या आरोग्याची प्रत्यक्ष जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बालके दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सफाळे येथील ठाणेपाडा अंगणवाडीतील दत्तक घेतलेल्या हार्दिक निलेश परेड या बालकाच्या घरी भेट देऊन त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा आढावा घेतला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रानडे यांनी अंगणवाडीतील बालकांसह उपस्थितांना मोदकाचे वाटप केले. हार्दिकचे वजन आणि उंची तपासण्याबरोबरच त्याला नियमित पोषण आहार मिळतो का, आरोग्य तपासणी केली जाते का आणि जंतनाशक औषध देण्यात आले आहे का, याची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली.
बालकाच्या पोषणस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी अंडी व दूध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांत त्याच्या आरोग्यात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच बालकाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दर महिन्याला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यावरही भर
कुपोषणाचा प्रश्न केवळ बालकाच्या आहारापुरता मर्यादित नसून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही त्याच्याशी संबंधित असल्याने रानडे यांनी हार्दिकच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जाणून घेतली. कुटुंबाकडे असलेली जमीन, भातशेती, पालेभाज्यांची लागवड तसेच उपलब्ध उत्पन्नाच्या साधनांची त्यांनी माहिती घेतली.
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून घरघंटी, शिलाई मशीन, पोल्ट्री शेड, कुक्कुटपालन आणि पशुपालन यांसारख्या उपजीविकेच्या योजनांचा लाभ कुटुंबाला देता येईल का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुटुंबाचे उत्पन्न वाढल्यास बालकाच्या पोषणाची अधिक चांगली काळजी घेता येईल, या उद्देशाने पात्र योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना रानडे यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी धनश्री पिंटू ठाकरे या कुपोषित बालिकेच्या घरीही भेट देऊन तिच्या आरोग्याची तसेच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली. कुपोषित बालकांच्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार विविध शासकीय योजनांशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
हार्दिक आणि धनश्री या दोन्ही बालकांसाठी सुकामेवा व इतर पौष्टिक खाऊही देण्यात आला.
या वेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *