
पालघर, दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी सांगितले.
पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ’ आणि पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, सैफुन शेख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
आदिवासी, महिला, युवक, शेतकरी, कारागीर आणि छोटे उद्योजक यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असून, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि समाजातील जनभागीदारीचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
विकासकामांची एकत्रित यादी तयार करणार
पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील समस्यांची एकत्रित यादी तयार करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रमुखांच्या समन्वयातून ही यादी तयार करून पालक सचिवांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानुसार आवश्यक निधी आणि प्रशासकीय बाबींसाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल. तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून जिल्ह्यात करावयाच्या कामांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याचे आश्वासन
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करून त्याची यादी शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा झाली आहे. प्रशासनातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे नाईक यांनी नमूद केले.
मागील पूरस्थितीत अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेल्याने वीज यंत्रणेचे नुकसान झाले. भविष्यात अशा परिस्थितीत वीजपुरवठा यंत्रणा सुरक्षित राहण्यासाठी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
वाढवण, बुलेट ट्रेन, विमानतळाचा स्थानिकांना लाभ हवा
वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ, रस्ते आणि रेल्वे अशा मोठ्या पायाभूत सुविधा जिल्ह्यात विकसित होत आहेत. या प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ स्थानिक शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे, असे नाईक यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याचा केवळ मोठ्या प्रकल्पांसाठी वापर होऊ नये, तर जिल्ह्यातील नागरिकांचे आयुर्मान, आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी या विकासाचा उपयोग झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आदिवासींच्या जमिनींच्या व्यवहारांवर लक्ष
आदिवासींच्या जमिनींच्या विक्रीसंदर्भातील प्रश्नावरही नाईक यांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याबरोबरच आदिवासींच्या जमिनींच्या व्यवहारात त्यांचे हित सुरक्षित राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासींना त्यांच्या जमिनीच्या व्यवहारातून योग्य आर्थिक लाभ मिळावा आणि त्यातून त्यांच्या मुलांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गैरप्रकार निदर्शनास आणून देण्याचे आवाहन
प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी काम करीत असून, एखाद्या ठिकाणी गैरप्रकार आढळल्यास तो प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले. पत्रकारांनीही जनजागृती करताना चुकीच्या बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याचा विकास केवळ एका व्यक्तीच्या प्रयत्नातून नव्हे, तर प्रशासन, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून साध्य होऊ शकतो. विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची गरज आहे, असे नाईक यांनी नमूद केले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून, दिव्यांग आणि वंचित घटकांचाही विशेष विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.