बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांचा यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय


अतिवृष्टी आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांची माहिती
बोईसर/नालासोपारा : बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास तरे यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस असला, तरी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याची माहिती शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आमदार तरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून विविध सामाजिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आमदारांच्या कार्यालयात सदिच्छा भेटी देण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी होत असते. मात्र, यंदा पालघर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारानुसार जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करून १९ सप्टेंबर रोजी आमदार विलास तरे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविण्यात आल्याचे वसंत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, शुभेच्छा सोहळे अथवा अनावश्यक खर्च न करता सध्याच्या परिस्थितीत जनतेच्या अडचणींमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य देण्याचे आवाहनही जिल्हाप्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *