भाजपला रामराम, काँग्रेसला सलाम; युवाशक्तीचा काँग्रेसकडे वाढता ओढा, देशभर बदलाची चाहूल?

भाजपला रामराम; वाणगाव ग्रामपंचायत सदस्य अक्षय धोडी काँग्रेसमध्ये
युवाशक्तीचा काँग्रेसकडे वाढता ओढा; कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
वाणगाव :जनतेचा वाली  भाजपचे सदस्य तथा वाणगाव ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य अक्षय धोडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालघर जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वायडा यांच्या उपस्थितीत वाणगाव येथील काँग्रेस कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने तसेच कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे अक्षय धोडी यांनी यावेळी सांगितले.
अक्षय धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी हा पक्षप्रवेश केवळ एका व्यक्तीचा नसून, तरुणाईचा काँग्रेसच्या विचारधारेकडे वाढता कल दर्शविणारा असल्याचे म्हटले.
“अक्षय धोडी हे धाडसी आणि तरुण नेतृत्व आहे. सत्तेत असतानाही भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेणे, हे त्यांच्या राजकीय धैर्याचे आणि काँग्रेसच्या विचारांवरील विश्वासाचे प्रतीक आहे,” असे ठाकूर यांनी सांगितले.
राहुल गांधी यांचे प्रगती, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक राजकारणाचे विचार आजच्या तरुणांना प्रेरणा देत आहेत. भारतातील तरुण तसेच सर्वसामान्य नागरिकांसमोर आता काँग्रेसशिवाय पर्याय उरलेला नाही, असा दावा यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.
वाणगावमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *