
गुणवंत शिक्षकांचा गौरव; समाजऋण फेडण्याचा लायन्स क्लबचा प्रयत्न
सफाळे : जनतेचा वाली ,शिक्षक दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ सफाळेच्या वतीने गुणवंत शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका स्व. प्रणिता प्रविण पाटील यांच्या स्मरणार्थ ‘लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार–२०२६’ तर स्व. प्रभाकर वामन वर्तक यांच्या स्मरणार्थ ‘लायन्स गौरव पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आले.
देवभूमी सभागृह, सफाळे पूर्व येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ सफाळेचे अध्यक्ष लायन जतिन कदम होते. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका व ज्येष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. लायन प्रशांत पाटील, डॉ. दीपक चौधरी आणि लिओ राज कपाडिया यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
‘शिक्षक हा समाजाचा आरसा’
आज शिक्षकांना अध्यापनाबरोबरच मतदार याद्या, जनगणना, विविध सर्वेक्षणांसह अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. या आव्हानांमध्येही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक संस्थांनी केलेला सन्मान हा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे अनुपमा खानविलकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील समस्या माध्यमांच्या माध्यमातून मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्यासाठी आपल्या शिक्षकांची प्रेरणा महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष जतिन कदम यांनी सांगितले. आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक मदत, वृक्षारोपण, वनबंधारे, कर्करोगग्रस्तांना मदत यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हेही क्लब आपले कर्तव्य मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंधारणाच्या क्षेत्रात आतापर्यंत १६४ चेकडॅम उभारल्याबद्दल डॉ. दीपक चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थी किशोर डोके यांनी सादर केलेल्या ‘बाप’ या कवितेने उपस्थितांना भावूक केले.
विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव
सामाजिक कार्यासाठी पांडुरंग झुऱ्या वर्तक, पर्यावरणासाठी डॉ. दीपक सखाराम चौधरी, सहकारासाठी पुरुषोत्तम ठकसेन पाटील, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. अतुल मार्तंड पुरंदरे, कृषी क्षेत्रासाठी उमेश शंकर पाटील, कलाक्षेत्रासाठी धनेश बळीराम गावड, महिला सक्षमीकरणासाठी हर्षदा अल्पेश घरत, साहित्य क्षेत्रासाठी महेंद्र रामचंद्र पाटील, सशस्त्र गणवेशधारी विभागासाठी हर्षल अरुण पाटील आणि क्रीडा क्षेत्रासाठी ऋणीता विशाल पाटील यांना ‘लायन्स गौरव पुरस्कार–२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत शिक्षक पुरस्काराच्या प्राथमिक गटात डॉ. फेलिक्स मार्क्यूस डिसोजा, प्रीतम सुनील राऊत, किशोर सोमा डोके, संजय नरेश गोतारणे, लक्ष्मण शंभू माच्छी आणि कौस्तुभ सखाराम कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
माध्यमिक गटात हेतल राजा शाह, चुडामन रामचंद्र पाटील, चंद्रकांत साहेबराव सोनवणे, वैभव सुदाम वर्तक, कल्पिता महेश भंडारी आणि हेमलता भगवानभाई तांडेल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, लिओ क्लबच्या नवीन पिनचे उद्घाटन करण्यात आले. ‘सॅल्यूट बियॉन्ड द फ्लॅग’ उपक्रमातील विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी कुंदन राऊत यांनी केले. पुरस्कारांची पार्श्वभूमी लायन प्रमोद पाटील यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रतिभा कदम यांनी केले, तर लायन संदेश पाटील यांनी आभार मानले.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी लायन कुंदन राऊत, लायन निकेश वर्तक, लायन संदेश पाटील, लायन उल्हास सोगले आणि लायन प्रमोद पाटील यांनी विशेष सहकार्य केले.