तलासरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च; दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

तलासरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च; दंगा काबू पथकाची रंगीत तालीम
तलासरी : जनतेचा वाली आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तलासरी पोलिसांनी शुक्रवारी रूट मार्च काढून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतली. या माध्यमातून पोलिसांनी गणेशोत्सव काळात कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला.
तलासरी नाका, बाजारपेठ, पाटीलपाडा, सुतारपाडा, हाडळपाडा ते तलासरी बसस्थानक या मार्गावर सकाळी १०.१५ ते दुपारी १.४५ या कालावधीत रूट मार्च काढण्यात आला. बाजारपेठ, प्रमुख चौक, गर्दीची तसेच संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
यानंतर तलासरी बसस्थानक परिसरात संभाव्य सामुदायिक तणाव, जमाव नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी दंगा नियंत्रण साहित्य व संरक्षणात्मक साधनांचा वापर करण्यात आला. प्रात्यक्षिकादरम्यान स्मोक सेल आणि स्टन ग्रेनेडचा वापर करण्यात आला.
या सरावात तलासरी, डहाणू पोलीस ठाणे, डहाणू विभागाचे स्ट्रायकिंग फोर्स आणि आरसीपी पालघरचे मिळून ३ अधिकारी व ४५ अंमलदार सहभागी झाले.
गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक व डीजेच्या वापराबाबतचे नियम पाळणे, मिरवणुकांमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे, अफवा पसरविणे टाळणे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवणे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
गणेशोत्सव हा उत्सवाचा, श्रद्धेचा आणि सामाजिक एकोप्याचा असतो. त्यामुळे कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *