गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कासा पोलिसांचा रूट मार्च; दंगा काबू योजनेची रंगीत तालीम


कासा : श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कासा पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (१२ सप्टेंबर) रूट मार्च काढण्यात आला. कासा पोलीस ठाणे ते सायवन नाका, सिटी बिल्डिंग आणि पुन्हा कासा पोलीस ठाणे असा रूट मार्च करण्यात आला.
या वेळी कासा पोलीस ठाण्याच्या आवारात दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. या कारवाईत कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि २२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. हजेरीच्या वेळी सर्व अंमलदारांना ‘एक गाव, एक अंमलदार’ या संकल्पनेनुसार दुय्यम अधिकाऱ्यांसोबत संबंधित गावांमध्ये संपर्क ठेवून आवश्यक त्या नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कासा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महावितरण आणि ग्रामपंचायत यांच्यासोबत समन्वय साधण्यात आला आहे. त्यांच्या अखत्यारीतील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन तसेच पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यांची डागडुजी, विद्युत खांबांची दुरुस्ती आदी बाबींचा समावेश आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *