
स्मार्ट मीटरविरोधात महामार्ग रोखणार;
सर्वसामान्य ग्राहकांच्या वाढत्या वीजबिलांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा; ७ सप्टेंबरला शिरसाड येथे आंदोलन
बोईसर : जनतेचा वाली स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीजग्राहकांवर वाढीव वीजबिलांचा बोजा पडत असल्याचा आरोप करत माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील यांनी महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ तास सुरळीत वीजपुरवठा होत नसतानाही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वीजबिलांची वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रश्नाकडे शासन आणि महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी थेट महामार्ग रोखण्याचे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अनियमित वाढ होत असल्याच्या तक्रारी असून, सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, वीजबिलातील अनियमित वाढीला आळा घालावा आणि ग्राहकांची दिशाभूल थांबवावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
“सर्वसामान्य जनतेसाठी आजही रस्त्यावरची लढाई लढण्यास तत्पर आहे,” अशी भूमिका घेत पाटील यांनी नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपला हक्क—आपल्या एकजुटीत; या आंदोलनातील आपली उपस्थिती हीच आपली शक्ती,” असे आवाहनही करण्यात आले आहे.
शिरसाड येथे आंदोलन
स्मार्ट मीटरविरोधातील हे आंदोलन सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरसाड येथील के.टी. रिसॉर्टजवळ आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला सर्वसामान्य वीजग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटर, वीजबिलातील वाढ आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरून येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, महावितरण आणि प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.