निनाद घरत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालघर जिल्हा सरचिटणीस, मीडिया प्रमुखपदी नियुक्ती


पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या पालघर जिल्हा सरचिटणीस आणि मीडिया प्रमुखपदी बोईसर येथील ज्येष्ठ पत्रकार निनाद घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा पक्ष कार्यालयात निनाद घरत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार म्हणून माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या निनाद घरत यांच्यावर पक्षाच्या जिल्हास्तरीय संघटनात्मक कामकाजासह माध्यमांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला पालघर जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे संघटन मजबूत करण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर माध्यमांशी संवाद साधताना निनाद घरत म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. पक्षाची ध्येयधोरणे आणि भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काम करणार आहे.”
घर‍त यांच्या नियुक्तीचे पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *