गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर; कासा पोलिसांची मंडळांना सूचना

गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर; कासा पोलिसांची मंडळांना सूचना
कासा : जनतेचा वाली ,गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि आनंदमय वातावरणात पार पडावा, यासाठी कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांची बैठक ४ सप्टेंबर रोजी कासा ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह आदिवासी संस्कृती व परंपरांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीला कासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंदार मारकवाड, पोलीस उपनिरीक्षक अनंत धांगडा, मंडळ अधिकारी श्री. चौरे, सरला टेकम, तलाठी गीता साठे, कासा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरिश्चंद्र मुकणे, स्थानिक पत्रकार महेंद्र पवार, जितेंद्र पाटील, ग्रामस्थ तसेच विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात तारपा नृत्य, ढोल, गौरी नाच यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याबरोबरच लहान मुलांसाठी चित्रकला, नृत्य आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. उत्सवात डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. मिरवणूक रस्त्याच्या एका बाजूने काढून वाहतुकीसाठी दुसरी बाजू खुली ठेवावी, तसेच आवश्यक ठिकाणी दोरीचा वापर करून शिस्त राखावी, अशा सूचना देण्यात आल्या. सर्वांच्या सहभागातून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
दरम्यान, बैठकीत केवळ गणेशोत्सवाच्या नियोजनावर चर्चा न करता विविध सामाजिक विषयांवरही जनजागृती करण्यात आली. अल्पवयीन मुलांचे विवाह रोखणे, ‘बेटी बचाओ–बेटी पढाओ’, ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहणे, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून एकता, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून उत्सव शिस्तबद्ध, सुरक्षित, व्यसनमुक्त आणि आनंदमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *