“चोर कितीही चलाख असला तरी पोलीस सव्वाशेर! डहाणू ज्वेलर्स दरोड्याचा छडा”

चोर कितीही हुशार असला, तरी पोलीस त्याच्यापेक्षा सव्वाशेर!

प्रतिनिधी जनतेचा वाली
डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवत करण्यात आलेल्या जबरी चोरीचा अखेर पालघर पोलिसांनी छडा लावला आहे. तब्बल ९० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी लुटून पसार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे तब्बल ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
२० जुलै रोजी डहाणूच्या इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये तीन आरोपी मास्क आणि काळ्या जॅकेटमध्ये दुकानात घुसले. दागिने लुटताना दुकानमालक विनय कैलास सोनी यांनी प्रतिकार केला असता एका आरोपीने बंदुकीतून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर दुकानाच्या काचा फोडून आरोपी पसार झाले. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पालघरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यशवंत सदू चौधरी याला २७ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत दिपेश यशवंत गवळी आणि विशाल चौरे या दोघांनाही १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, रविंद्र वानखेडे, रोहित खोत, गोरखनाथ राठोड आणि राजेश वाघ यांच्यासह पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच पोलीस हवालदार दीपक राऊत, संदिप सूर्यवंशी, संदिप सरदार, भगवान आव्हाड, कपिल नेमाडे, नरेंद्र पाटील, संजय धांगडा, दिनेश गायकवाड, कैलास पाटील, राकेश पाटील, संतोष निकोळे, दिलीप जनाठे, मुद्दसर दांडेकर, पोलीस नाईक कल्याण केंगार, पोलीस अंमलदार नरेश घाटाळ, वैभव जामदार, प्रशांत निकम, बजरंग अमनवाड, विशाल लोहार, विशाल कडव आणि महेश अवतार यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
सायबर तपासात पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस अंमलदार रूपेश पाटील, रोहित तोरस्कर आणि अक्षय शेटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला.
शौर्यपदकाने सन्मानित पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलिसांची ही दमदार कामगिरी पुन्हा एकदा पोलिसांच्या तपास यंत्रणेची ताकद अधोरेखित करणारी ठरली आहे. चोर कितीही चलाख असला, तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही, याचा प्रत्यय या कारवाईतून आला आहे.
— जनतेचा वाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *