
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांचा छापा
डहाणू : तालुक्यातील कंकाडी परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती असलेल्या जुगार अड्ड्यावर डहाणू पोलिसांनी अखेर धडक कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कंकाडी येथील प्रकाश वळवी यांच्या वाडीमध्ये गोपाळ वसंत मेहेर आणि त्याचा साथीदार साबाज शाहरुख पठाण हे इतर साथीदारांसह पैशांवर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवालदार समीर किसन मासमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डहाणू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड यांच्यासह अंकुर शेलार, तुषार बोरसे, विश्वास धारने, समीर मासमार, समीर सखे, सुबोध पवार, केशव भोये आणि स्मितेश रावते यांनी सहभाग घेतला.
डहाणू परिसरात अवैध जुगार अड्ड्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या जुगार अड्ड्यावर अखेर कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
जनतेचा वाली — डहाणू