वीज बिल कमी करण्यासाठी आठ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

पालघर :जनतेचा वाली , वाढीव वीज बिल कमी करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रदीप सुभाष महाजन (३८) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिठागर रोड, खारेखुरण, पालघर येथे ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या घरातील वीज बिल कमी करून देण्यासाठी महाजन याने आठ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाने सापळा रचला. मिठागर रोड, खारेखुरण येथे लाचेची रक्कम स्वीकारताना महाजन याला पकडण्यात आले. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश लक्ष्मण डोंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक दादाराम सुभाष कराडे यांनी काम पाहिले. सापळा पथकात राकेश डोंगे यांच्यासह पोलीस हवालदार बिलास भोये, जितेंद्र गवडे, प्रकाश दळवी आणि आकाश लोहार यांचा सहभाग होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये असंतोष असतानाच, बिल कमी करून देण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वीज बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे अधिकृत पद्धतीने निराकरण होणे अपेक्षित असताना त्यासाठी लाच मागितली जात असल्यास अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या ग्राहकामुळे लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *