पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांना शौर्य पदक; १५ अधिकारी-अंमलदारांनाही सेवा पदकांचा सन्मान

जनतेचा वाली ग्रुप परिवाराकडून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन

पालघर पोलिस दलातील १५ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदके
२५ वर्षांच्या सेवेसाठी सात जणांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’; आठ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांना शौर्य पदक
पालघर : जनतेचा वाली ,स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्हा पोलिस दलातील दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेला मोठा सन्मान मिळाला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांच्या माध्यमातून पालघर पोलिस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये २५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या सात जणांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या आठ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ मिळविणाऱ्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक रविंद्र सुभाष नाईक, पोलिस निरीक्षक रणवीर प्रकाश व्यास, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बाजीराव किंद्रे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बाबुराव वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पांडुरंग दिघोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश महादू नवले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण हरिश्चंद्र अंभिरे यांचा समावेश आहे.
तर ‘उत्कृष्ट सेवा पदक’ मिळविणाऱ्या आठ जणांमध्ये पोलिस निरीक्षक प्रदीप श्रीपती पाटील, पोलिस निरीक्षक सुनील साहेबराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक विशाल राजेंद्र शिर्के, पोलिस हवालदार दिपक शांताराम राजत, पोलिस हवालदार सचिन नारायण चौधरी, पोलिस हवालदार पराग कमलाकर म्हात्रे, पोलिस हवालदार नरेंद्र नाना पाटील आणि पोलिस हवालदार दिनेश मावजी गायकवाड यांचा समावेश आहे.
दरम्यान, पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांना गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शौर्य पदक जाहीर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पालघर पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दीर्घकाळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा झालेला हा गौरव पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अधिकारी ते कर्मचारी अशा सर्व स्तरांवर कर्तव्य बजावताना दिलेल्या योगदानाची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांनी पदकप्राप्त सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि उल्लेखनीय सेवेची पावती मानली जात आहे.

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी जुगार मटका दारू तस्कर यांचा कर्दनकाल म्हणून पोलीस अधीक्षक येथे देशमुख यांचा उल्लेख होत असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास यशस्वी ठरलेले पोलीस अधीक्षक म्हणून विशेष कौतुक होत आहे जनतेचा वाली ग्रुप परिवाराकडून सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस अधीक्षकांचे विशेष कौतुक व अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *