
आदिवासी तारपा संस्कृतीचा जागतिक वारसा जपणाऱ्या पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा गौरव
” विराज इंटरनॅशनल स्कूलकडून एक लाख रुपयांचा सन्मान; ‘एक शाम : देश के नाम’ कार्यक्रमात तारपा वादनाने जिंकली उपस्थितांची मने”
बोईसर : जनतेचा वाली आदिवासी तारपा वादनाची समृद्ध परंपरा आपल्या कलेच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचविणारे ज्येष्ठ तारपा वादक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांचा विराज इंटरनॅशनल स्कूल, बोईसर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘एक शाम : देश के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमात धिंडा यांना एक लाख रुपयांचा सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवामुळे पालघरच्या आदिवासी कला-संस्कृतीचा आणि तारपा परंपरेचा सन्मान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा परिसरातील भिकल्या धिंडा यांनी आपले आयुष्य आदिवासी तारपा संगीत, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी समर्पित केले आहे. तारपा वादनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख देशाच्या विविध भागांत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.
विराज इंटरनॅशनल स्कूलने त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत एक लाख रुपयांचा सन्मान प्रदान केला. कार्यक्रमाला पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पालघर जिल्हाधिकारी इंदू रानी झाखड, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘एक शाम : देश के नाम’ या कार्यक्रमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा संदेश देण्यात आला. विराज इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक व वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. अजय हरी हरलाल तसेच प्राचार्य डॉ. देव वसिष्ठ उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, कविता तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘मेरी भारत की बेटी’, ‘तेरा हिमालय आकाश छू ले’ आणि ‘माँ तुझे सलाम’ यांसारख्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान, देशभक्ती आणि भारतीय संस्कृतीची विविधता या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या सन्मानाचे. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची आणि पारंपरिक तारपा कलेच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सन्मान स्वीकारल्यानंतर भिकल्या धिंडा यांनी केलेल्या तारपा वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक तारपाच्या सुरांनी कार्यक्रमस्थळी आदिवासी संस्कृतीचा अनोखा अनुभव निर्माण झाला.
यावेळी प्राचार्य डॉ. देव वसिष्ठ उपाध्याय यांनी सांगितले की, ‘एक शाम : देश के नाम’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि भारताच्या विविधतेचा अभिमान निर्माण करणारा उपक्रम आहे. पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांचीही आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रात ‘भारत एक खोज – भारत की सांस्कृतिक यात्रा’ या संकल्पनेतून देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. काश्मीरपासून आसामपर्यंत, उत्तराखंडपासून गुजरात आणि कर्नाटकपर्यंतच्या सांस्कृतिक विविधतेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या सामूहिक सादरीकरणातून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा परिवाराने एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा विराज इंटरनॅशनल स्कूलने केलेला सन्मान हा एका कलाकाराचा गौरव न राहता पालघर जिल्ह्याच्या आदिवासी तारपा परंपरेचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पारंपरिक कलेच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचविणाऱ्या धिंडा यांच्या कार्याला मिळालेली ही दाद भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
