

पालघरच्या वीर हुतात्माना अभिवादन
स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना पालघरमध्ये अभिवादन
पालघर :जनतेचा वाली, ब्रिटिश साम्राज्याविरोधातील १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभागी होत पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
१९४२च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी हौतात्म्य पत्करलेल्या काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड) आणि रामचंद्र महादेव चूरी (मुरबे) यांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले.
हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, हुतात्म्यांचे नातेवाईक, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण जिवंत ठेवत त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.



