
पालघर, प्रतिनिधी : शिवसेनेचे उपनेते, माजी जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचे वडील रमेश तुकाराम पिंपळे यांचे वयाच्या ९६व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पिंपळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पालघर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सेवाभाव जपणारी अशी व्यक्तिमत्व होत आहेत दुर्मिळ
२४ मार्च १९३१ रोजी जन्मलेल्या रमेश पिंपळे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये जपली. त्यांनी सुमारे १५ वर्षे रेल्वे पोलिस दलात सेवा बजावली. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीसह वीटभट्टी, किराणा, ताडी व्यवसाय तसेच भात खरेदी-विक्रीच्या व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रामाणिक व्यवहारामुळे आणि लोकाभिमुख स्वभावामुळे परिसरात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांची निष्ठा होती. शिवसेनेच्या विस्ताराच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारे मदत केली. विशेषतः १९८० च्या दशकात विविध प्रकरणांत अडकलेल्या शिवसैनिकांना जामीनासाठी आर्थिक व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले. अडचणीत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी निःस्वार्थपणे मदतीचा हात दिला होता.
सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे, गावातील विविध उपक्रमांना हातभार लावणे आणि सर्वांशी आपुलकीने वागणे ही त्यांची ओळख होती. त्यांच्या साधेपणा आणि मनमिळावू स्वभावामुळे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.
त्यांच्या पश्चात प्रीतम पिंपळे, शिवसेनेचे उपनेते उत्तम पिंपळे तसेच पूनम संखे, नीलम पिंपळे आणि निशा संखे असा परिवार आहे.
रविवारी (२ ऑगस्ट) मासवान येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी अखेरचा निरोप दिला.
रमेश पिंपळे यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या समाजाभिमुख कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.