जव्हारमध्ये शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा भव्य मेळावा; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण विस्ताराचा निर्धार

जव्हारमध्ये शिक्षक शक्तीचे प्रदर्शन; शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जव्हार प्रतिनिधी जनतेचा वाली महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित ‘पालघर जिल्हा शिक्षक मेळावा २०२६’ रविवारी (२ ऑगस्ट) जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षक आमदार तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात पालघर जिल्ह्यासह कोकण विभागातील सुमारे ६०० हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मेळाव्याचे उद्घाटन विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे होते. यावेळी राज्य सचिव अरुण भोईर, राज्य उपाध्यक्ष राजेश पाटील, कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे, विभागीय सदस्य अरविंद ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख तथा समन्वयक विठ्ठल गोरे, पालघर शहर जिल्हाध्यक्ष महेश कुडू, पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंता पाटील, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष रॉबर्ट आल्मेडा यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालघर ग्रामीणचे जिल्हा सचिव प्रशांत पारगावकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विविध मान्यवरांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षणाची गुणवत्ता, संघटनात्मक बळकटी आणि शिक्षकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रोशनी गावड, राज्य सचिव अरुण भोईर, समन्वयक विठ्ठल गोरे आणि रॉबर्ट आल्मेडा यांनीही आपली मते मांडली.
मेळाव्यात अनेक शिक्षकांनी शिवछत्रपती शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश करत संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अश्विनी तंवर, चित्रा शेळके आणि राहुल पाटील यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव केला. आश्रमशाळेच्या शिक्षिका दीपाली सांबरे यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाने सक्षमपणे पार पाडावी, असे आवाहन केले. संघटना अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक सदस्याने किमान पाच ते दहा नवीन सभासद जोडावेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच पालघरनंतर कोकणातील विविध जिल्ह्यांत अशाच शिक्षक मेळाव्यांचे आयोजन करून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल गोरे, राज्य उपाध्यक्ष राजेश पाटील, जव्हार तालुकाध्यक्ष अशोक तुंबडा, मोखाडा तालुकाध्यक्ष प्रशांत रुकारी, वाडा विभागाचे विनोद पाटील, विक्रमगड विभागाचे दीपक राव तसेच सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर, बोईसर, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरातून मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाल्याने हा मेळावा ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पालघर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंता पाटील यांनी केले. शिस्तबद्ध नियोजन, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या या मेळाव्याचा समारोप “जय शिक्षक, जय संघटना, जय शिवराय, जय महाराष्ट्र!” या घोषणांनी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *