रोबोटिक्समध्ये पालघरच्या अनाचा झेंडा; राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक, दक्षिण कोरियासाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक, दक्षिण कोरियासाठी निवड
पालघर, प्रतिनिधी जनतेचा वाली : पालघर तालुक्यातील चहाडे गावातील कु. अना निलेश पाटील हिने रोबोटिक्स क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एमआयटी, पुणे येथे १७ व १८ जुलै रोजी झालेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये तिने आपल्या संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करत ‘लाइन फॉलोअर – ओपन कॅटेगरी’ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल, पालघर येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेणारी अना आणि तिच्या संघाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, संघभावना व नाविन्यपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर हे यश मिळविले. या कामगिरीमुळे संपूर्ण संघाची यावर्षाअखेरीस दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या ‘रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप’ साठी निवड झाली आहे.
संघात कु. अना निलेश पाटील (कर्णधार), कु. निहारिका हर्षद सखे, कु. वृद्धी दीपक पितळे, कु. जिशा जयेशकुमार पटेल आणि कु. निष्ठा माळी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सौ. प्रतीक्षा सांखे आणि श्री. कुणाल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
चहाडे गावातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे पालघर जिल्हा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला असून, दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही भारतीय संघाने उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *