पूरात वाहून गेले संसार… पण वाहून गेली नाही माणुसकी! स्वखर्चातून लाखोंची मदत करत संजय पाटील ठरले पूरग्रस्तांसाठी आधारवड


शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केळवे, , किराट, बोरशेती, नानिवली, चिंचारे सह अनेक गावांतील गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप
पालघर, दि. २५ जुलै : पालघर जिल्ह्यातील अभूतपूर्व अतिवृष्टीने अनेक कुटुंबांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले. कोणाचे घर कोसळले, कोणाचे अन्नधान्य वाहून गेले, तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू चिखलात गाडल्या गेल्या. शेती, फळबागा, जनावरे, रस्ते, वीज आणि दळणवळण व्यवस्था कोलमडून पडली. शासन यंत्रणा मदतकार्य करत असतानाच समाजातील काही संवेदनशील हातही मदतीसाठी पुढे सरसावले. त्यामध्ये बोईसर येथील शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी उभारलेला मानवतेचा आदर्श विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पाहून केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी संजय पाटील यांनी स्वतःच्या खिशातून मदतीचा निर्णय घेतला. कोणतीही प्रसिद्धी, राजकीय अपेक्षा किंवा दिखाऊपणा न ठेवता त्यांनी सुमारे ₹४ लाख खर्च करून अन्नधान्याचे संसारोपयोगी किट तयार केले आणि पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत स्वतः जाऊन पोहोचवले.
केळवे, किराट बोरशेती, नागझरी, नानिवली, चिंचारे आणि इतर पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अनेक गरजू कुटुंबांच्या हातात अन्नधान्याचे किट सुपूर्द करण्यात आले. अनेक घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी धान्याचा एक दाणाही शिल्लक नव्हता. काही कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले होते. अशा वेळी ही मदत त्यांच्यासाठी केवळ अन्नधान्य नव्हती, तर पुन्हा उभे राहण्याचा आत्मविश्वास देणारी ठरली.
या मदतकार्यामध्ये शिवशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही अहोरात्र परिश्रम घेतले. पूरग्रस्त भागात पोहोचणे अवघड असतानाही त्यांनी प्रत्यक्ष गावागावांत जाऊन गरजू कुटुंबांचा शोध घेत मदत पोहोचवली. संकटाच्या काळात समाजासाठी उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
आजच्या काळात जात, धर्म, पंथ, भाषा आणि राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे हात फार कमी दिसतात. मात्र शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील यांनी केलेले कार्य हे संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरले आहे. शासनाची मदत नियमानुसार मिळेल; परंतु संकटाच्या पहिल्या क्षणी धावून येणारा माणूसच खरा आधार असतो, याची जाणीव या मदतकार्याने करून दिली.
पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबांनी संजय पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक घरांमध्ये पुन्हा चूल पेटली, लहान मुलांना अन्न मिळाले आणि निराश झालेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिलास्याचे हास्य उमटले.
ग्रामीण भागात संजय पाटील यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली जबाबदारी कशी निभावावी याचा आदर्श त्यांनी घालून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पूराच्या पाण्याने अनेकांचे संसार वाहून गेले, पण संजय पाटील यांच्या मदतीने माणुसकीचा झरा मात्र अधिकच प्रवाही झाला, अशी भावना पूरग्रस्त नागरिकांच्या मनात उमटत आहे.
जनतेचा वाली
संपादक  विजय घरत🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *