
नालासोपारा/सफाळे/बोईसर, प्रतिनिधी : गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर, बोईसर आणि परिसरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी ढेकाळे येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयामार्फत आपत्तीग्रस्त व गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्य किट वितरणाचा उपक्रम सुरू केला आहे. वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर आणि बोईसर परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत ही मदत टप्प्याटप्प्याने पोहोचविण्यात येत आहे.
या मदत उपक्रमात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत. वसई–विरार महापालिका क्षेत्रात अभिषेक सिंह ठाकूर, निलेश मौर्या, इमरान सिद्दीकी व अन्य कार्यकर्ते, सफाळे परिसरात उज्ज्वल पाटील व साहिल पाटील, मनोर परिसरात चेतन साळुंखे तसेच बोईसर परिसरातील शिवसैनिकांच्या माध्यमातून अन्नधान्य किटचे वितरण सुरू आहे. विधवा महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अनाथ आणि इतर गरजू कुटुंबांना प्राधान्याने मदत दिली जात असल्याची माहिती देण्यात आली.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. संकटग्रस्त कुटुंबांना वेळेवर दिलासा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात असून, आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विलास तरे यांच्या कार्याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
