ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय पंचनामे तातडीने करा – आमदार विलास तरे

ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय पंचनामे तातडीने करा; पूरस्थितीवर आमदार विलास तरे यांची प्रशासनाला सूचना
ढेकाळे : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच बोईसर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आमदार विलास तरे यांनी जनसंपर्क कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण भागातील प्रत्येक गाव तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने व वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाच्या नियमानुसार मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महसूल विभाग व महानगरपालिकेने संयुक्त पाहणी करून पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, पूरग्रस्तांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा, तसेच एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश आमदार तरे यांनी दिले.
शहरातील नाले, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा स्वतंत्र अभ्यास करून नैसर्गिक नाल्यांची मूळ रुंदी कायम राखणे, अतिक्रमणांमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करणे, राजावली व टिवरी परिसरातील महसूल विभागाच्या जमिनींवरील अतिक्रमणांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करणे, तसेच भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.
महावितरण विभागाने वीजपुरवठ्याबाबतचा आढावा सादर केल्यानंतर तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाला साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेणे, सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे, दूषित पाणी आढळणाऱ्या भागात आवश्यक औषधांचे वितरण करणे आणि दोन फिरते दवाखाने गावागावात पाठवून आरोग्य तपासणी व उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले. कृषी विभागाला शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपविभागीय अधिकारी (पालघर) श्याम मदनुरकर, उपविभागीय अधिकारी (वसई) शेखर घाडगे, तहसीलदार दिपक गायकवाड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी व निलेश म्हात्रे, तालुका कृषी अधिकारी सुरेश जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (महावितरण) महेश विजय माधवी, उपकार्यकारी अभियंते एस. जे. मुंगारे व नरेंद्र संगेन, कार्यकारी अभियंते ईश्वर एम. भारती व नितीन संखे, कनिष्ठ कार्यकारी अभियंता गुणवत झालकोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शैलेंद्र गायकवाड, अरुण बाळू चौधरी, विनोद जाधव, ए. के. संखे, विभागीय अभियंता संदीप राऊत, सहाय्यक अभियंता दत्ताप्रसाद गोळफडे, मंडळ कृषी अधिकारी पुरुषोत्तम धाक्रे व हरेश जनाठे उपस्थित होते.
याशिवाय भाताणे येथील शिवसैनिक शैलेश खोत, अभिषेक सिंह ठाकुर, सावरे-एन्बूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वनगा, उपसरपंच रमेश ठाकरे, शिवसैनिक भरत बरडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा, शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत पोहोचवावा आणि भविष्यात पूरस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन आमदार विलास तरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *