
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, पशुपालन आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाधितांना तातडीने दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कुणबी सेनेने केली आहे. या मागणीसंदर्भात कुणबी सेना, पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ओहळ, नाले आणि नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी बांध फुटले. पुराचे पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात दगड, रेती आणि गाळ साचला असून अनेक शेतजमिनी शेतीयोग्य राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाचेही संकट उभे ठाकल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून भात पिकाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरलेले बियाणे वाहून गेले. अनेक ठिकाणी पुन्हा पेरणी करण्याची संधीही मिळाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले असल्याचे कुणबी सेनेने म्हटले आहे.
अतिवृष्टीचा फटका ग्रामीण भागातील घरांनाही बसला आहे. अनेक घरांचे अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, अन्नसाठा, घरगुती साहित्य तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पोल्ट्री व्यवसाय, गोठे, पशुखाद्य, जनावरांचा चारा आणि शेतीपूरक साधनसामग्रीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पशुपालकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काही भागांत भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लालठाणे गावात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान झाले असून दोन विहिरी पूर्णपणे गाडल्या गेल्याचा दावा कुणबी सेनेने केला आहे.
मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावरील अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अनेक दिवस अशक्य झाले. त्यामुळे ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर आणि इतर शेती अवजारे शेतात नेता आली नाहीत. परिणामी मशागत आणि पेरणी वेळेत होऊ शकली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रावते, बोरशेती, किराट, नागझरी, निहे, लोवरे, धुकटन, बहाडोली, साखरे, नावजे, गिराळे आणि पारगावसह अनेक गावांतील शेतकरी या समस्येने प्रभावित झाल्याचे निवेदनात नमूद आहे.
कुणबी सेनेने प्रशासनाकडे सर्व बाधित भागांचे तातडीने पंचनामे करण्याबरोबरच शेती, घरे, पशुपालन आणि पोल्ट्री व्यवसायाच्या नुकसानीची भरपाई, शेतांतील दगड व गाळ हटविण्यासाठी विशेष अनुदान, मोफत बियाणे व कृषी साहित्य, फुटलेल्या बांधांची तातडीने दुरुस्ती, तसेच मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावरील अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली आहे. याशिवाय संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून बाधित शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करून सर्व नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुणबी सेना पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश वि. पाटील यांनी प्रशासनाला दिला.

