
मुरबाड, १० जुलै : संपादक विजय घरत ,ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) संचालकपदी निवड झाल्यानंतर निलेश सांबरे यांचा मुरबाड येथील कुुणबी समाज हॉलमध्ये नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सांबरे यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला देत, प्रस्थापितांच्या विरोधात एकट्याने निवडणूक लढवूनही सभासद आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय मिळाल्याचे सांगितले. हा केवळ वैयक्तिक विजय नसून परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत त्यांनी सर्व निर्णय पारदर्शक, नियमबद्ध आणि सभासदांच्या हिताचे असतील, असे स्पष्ट केले. तसेच बँकेतील भरती प्रक्रिया IBPS पद्धतीने, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवरच राबविण्याची भूमिका त्यांनी मांडली.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील पात्र स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हिताला प्राधान्य देत टीडीसीसी बँकेला राज्यातील आदर्श सहकारी बँक बनविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी सांबरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.