
पालघरमध्ये १३,०९४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा;
पालघर 8/7/2026 : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील १३ हजार ९४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र कर्ज खात्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पात्र पीक कर्जांचाही या योजनेत समावेश असल्याने जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित सेवा संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा, सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
