
पालघर जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज; आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा
पालघर, ७ जुलै : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी आणखी बळकट केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व प्रमुख विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन अत्यावश्यक सेवा अखंडित ठेवण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, आरोग्य, महसूल, पुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षण तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी २४ तास सज्ज राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महावितरणला रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बचाव केंद्रे आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जलद प्रतिसाद पथके तैनात ठेवण्याच्या तसेच मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत राहण्यासाठी दूरसंचार टॉवर्सना वीजपुरवठा कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेला पावसामुळे बंद पडलेले रस्ते त्वरित सुरू करणे, रस्त्यांवरील पाणी आणि पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पीएमजीएसवाय आणि सीएमजीएसवाय अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांवरही नियमित देखरेख ठेवली जाणार आहे.
आरोग्य विभागाने जलजन्य आणि साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आवश्यक औषधे, जंतुनाशके, लसी तसेच अँटी स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. पावसानंतर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यावरही भर देण्यात आला.
पुरवठा विभागाने जिल्ह्यात धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, बाधित कुटुंबांना तातडीने मदत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले. पालघर व डहाणू नगर परिषदांना पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची स्वच्छता आणि अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महसूल विभागाला घरांचे, शेतीचे व अन्य नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यांकन करावे, तर मच्छिमारांच्या नुकसानग्रस्त नौकांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना मदत देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
ग्रामपंचायती, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळावी, तसेच आवश्यकतेनुसार शिक्षकांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध राहावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून सर्व बचाव केंद्रांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
यावेळी नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड म्हणाल्या, “मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.”
— जनतेचा वाली